
मुंबई, २९ ऑक्टोबर (हिं.स.) : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आमदार बच्चू कडू यांना महामार्ग आणि इतर सर्व सार्वजनिक रस्ते तातडीने मोकळे करण्याचा आदेश दिला आहे.
नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की, रस्ते मोकळे करताना जर बच्चू कडू किंवा त्यांच्या समर्थकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच हायकोर्टाने पोलिस प्रशासनालाही स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जर आंदोलनकर्त्यांनी आदेशाचे पालन केले नाही, तर पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि संबंधित अधिकारी यांनी तातडीने मार्ग मोकळे करून वाहतूक सुरळीत करावी. आदेशाची अंमलबजावणी बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात यावी, तसेच अंमलबजावणीचा अहवाल उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.तसेच, आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना सन्मानपूर्वक बाहेर काढावे, असा निर्देश न्यायालयाने दिला. तसेच 26 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, न्यायालयाने आंदोलकांवर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान कडूंच्या नेतृत्त्वातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. परंतु, उच्च न्यायालयाचे आदेश येताच आंदोलकांनी तत्काळ प्रभावाने आंदोलन गुंडाळत महामार्ग मोकळा करवून दिला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी