सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करून घेण्यासाठी ६५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीतील दोघांना अकलूज पोलिसांनी अटक केली. समीर पानारी आणि सतीश सावंत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.या गुन्ह्यातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याच्यासह अन्य दोघांचा अकलूज पोलिसांकडून शोध सुरू आहे. खंडणीखोरांच्या टोळीत सहायक फौजदाराचा समावेश असल्याचे समोर आल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अकलूज येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील १३ जणांवर मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे आला होता. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी समीर अब्बास पानारी (वय ३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) याने अकलूजमधील प्रदीप माने यांना फोन करून ६५ लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पानारी याच्या चौकशीतून सतीश सावंत, सहायक फौजदार मिलिंद नलावडे, कमलेश कानडे आणि लाला ऊर्फ लालासाहेब अडगळे यांची नावे समोर आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड