
रायगड, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 1.57 लाख नवीन ग्राहकांची भर घातली आहे. तर एअरटेलने 52 हजार 255, वोडाफोन-आयडियाने 50 हजार 504, आणि बीएसएनएलने 34 हजार 610 नवीन ग्राहक जोडले असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.
जिओने मागील तीन महिन्यांपासून आपल्या ग्राहकसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली आहे. उच्च गतीचे इंटरनेट, स्वस्त प्लॅन आणि विस्तारित कव्हरेजमुळे ग्रामीण भागातदेखील जिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. एअर फायबर सेवांनाही वाढता प्रतिसाद:
ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सक्रिय जिओ एअर फायबर वापरकर्त्यांची संख्या 5,52,265 इतकी झाली आहे. तुलनेत एअरटेलचे सक्रिय फायबर ग्राहक 2,00,813 इतके आहेत. जलद इंटरनेट स्पीड, ऑनलाईन शिक्षण आणि घरून काम (Work From Home) संस्कृतीमुळे या सेवेची मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र हे दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य राज्य ठरत असून, डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यात खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके