
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
मूळची अकोलेकर अनया अमरावतीकर हिने अवघ्या १३ व्या वर्षी नृत्याविष्कारात सामासमुद्रापार झेंडा रोवला. आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला. अनयाच्या यशाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ‘ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट ॲन्ड कल्चर’ या युनेस्कोच्या अधिकृत भागीदार संस्थेद्वारे पंधराव्या ‘कल्चरल ओलंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन थायलंड देशातील पटाया शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आठव्या वर्गात शिकणारी अनया निखिल अमरावतीकर हिने सहभाग घेतला. या अत्यंत कठीण व मानाच्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अनयाने अतिशय बहारदार सादरीकरण करून प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. तिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जगातील अनेक देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. अनयाच्या यशामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची आणि भारताची मान उंचावली आहे.
अनया ही अकोल्याच्या प्राध्यापिका पद्मजा अमरावतीकर व प्रा.श्रीकृष्ण अमरावतीकर यांची नात असून,अश्विनी व सनदी लेखापाल निखिल अमरावतीकर यांची कन्या आहे. जागतिक नृत्य स्पर्धेत अनयाने आपल्या नृत्यकौशल्याची चमक दाखवत यश संपादन केले. अनया ही पुणे येथील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. अनयाने सातत्य, परिश्रम, नृत्यकलेवरील निष्ठा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यश प्राप्त केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनयाने भारतीय संस्कृती व नृत्यकलेचा झेंडा रोवल्यामुळे तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे