अकोल्यात १६ नोव्हेंबरला चौथे राज्यस्तरीय क्षत्रिय राजपूत युवक-युवती परिचय संमेलन
अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आणि महाराणा प्रताप सेवा समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थे राज्यस्तरीय क्षत्रिय राजपूत युवक-युवती परिचय संमेलनाचे भव्य आयोजन येत्या १६ नोव्हेंबर रोजी अकोला शहरात करण्यात आले आहे. समा
P


अकोला, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आणि महाराणा प्रताप सेवा समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थे राज्यस्तरीय क्षत्रिय राजपूत युवक-युवती परिचय संमेलनाचे भव्य आयोजन येत्या १६ नोव्हेंबर रोजी अकोला शहरात करण्यात आले आहे. समाजातील तरुण पिढीला विवाहासाठी योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी व समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंह ठाकूर यांनी दिली.

हे संमेलन प्रमिलाताई ओक सभागृह, बसस्थानक चौक, अकोला येथे पार पडणार असून त्यासाठी समितीकडून तयारीला वेग आला आहे. राज्यभरातून युवक-युवती या परिचय संमेलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक असून आतापर्यंत तब्बल २०० युवक-युवतींनी नोंदणी केली आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठेवण्यात आली असून इच्छुक युवक-युवतींनी महाराणा प्रताप बाग, सिटी कोतवाली चौक, अकोला येथे असलेल्या समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विशेष म्हणजे समाजातील दिव्यांग, विधवा आणि घटस्फोटीत युवक-युवतींसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले की, या संमेलनात सहभागी युवक-युवतींच्या परिचयासाठी सुसज्ज नोंदणी प्रणाली, माहितीपत्रके, छायाचित्र प्रदर्शन आणि सल्लामसलत सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर नोंदणीधारकाना परिचय पुस्तिका मोफत देण्यात येणार आहे. तसेच समाजातील ज्येष्ठ मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती आणि विवाह सल्लागार या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतील. संमेलनात येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य, युवक-युवती संघटना आणि विविध शाखांचे पदाधिकारी उत्साहाने कार्यरत आहेत. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाज ऐक्य दृढ करण्याचे आवाहन अध्यक्ष पृथ्वीराजसिंह ठाकूर यांनी केले आहे. या संमेलनाच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९२८४६३४८३५ / ९४२०१०४३८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande