
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात झीरो डेथ, झीरो इन्जुरी, झीरो मिसिंगवर भर देण्यात येणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक साधूग्रामसाठी ११५० एकर जागा तसेच त्र्यंबकेश्वरच्या साधूग्रामसाठी २२५ एकरवर साधूग्राम उभारण्यात येणार असल्याचे सिंह म्हणाले.
नाशिकमधील वर्तमानपत्रांच्या संपादक व मुख्य वार्ताहरांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा सादर केला. कुंभमेळ्याच्या कामांसाठी १८ महिन्यांचा कालावधी असून अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांना गती मिळावी म्हणून राज्य सरकारने आतापर्यंत साडेसात हजार कोटींचा निधी वितरित केला असून अनेक कामांच्या निविदा अंतिम होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. मार्च २०२७ पर्यंत कुंभमेळ्याची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता दोन ते सव्वादोन किलोमीटरचा घाट तयार करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचे विभाजन होऊन कोणतीही दुर्घटना घडणार नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीममुळे एका क्लिकवर सर्व प्रोजेक्टची माहिती मिळणार आहे. कुंभमेळ्यात सुमारे आठ कोटींच्या आसपास भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला असून त्या दृष्टीने कामांचे नियोजन सुरू आहे. येणाऱ्या भाविकांसाठी टेंट सिटी देखील उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात साधारण पाच ते सात टेंट सिटी उभारणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. अध्यात्म आणि पर्यटन यासाठी या टेंट सिटी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
कुंभमेळ्यात भाविकांसाठी पाणीपुरवठा २४ तास सुरू राहणार असून त्र्यंबकेश्वरसाठी आठ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे तर मुकणे आणि गंगापूर धरण मिळून ८०० एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नाशिक साधूग्रामसाठी चार लाख लिटर पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून २४ तास पाणी उपलब्ध असणार आहे. कुंभमेळ्यात गाईड आणि टॅक्सी मोठ्या प्रमाणात लागणार असल्याने त्यासाठी कौशल्य विकास आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास महापालिका, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सुसज्ज असणार आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये सिंहस्थ प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण केली जात आहेत. येणाऱ्या काळात सिंहस्थाच्या नियोजनासाठी सामाजिक, औद्योगिक, बांधकाम संघटना व विविध एनजीओच्या बैठका घेऊन त्यांच्याशी देखील चर्चा करून योग्य ती नियोजनासाठीची पावले उचलली जाणार असल्याचे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV