
- खराब रस्त्यांच्या प्रश्नावर कंत्राटदाराविरुद्ध ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ अंतर्गत सुनावणी
गडचिरोली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेची स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आज सुनावणी घेतली. खराब रस्त्यांच्या गंभीर प्रश्नावर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.
शासकीय निविदेनुसार महामार्गाचे बांधकाम, डांबरीकरण, दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असताना, सदर रस्त्यांची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर निष्काळजीपणाची स्वतः दखल घेत जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध प्रकरणाची नोंद करून आज सुनावणी घेतली.
ही कारवाई ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ मधील कलम १५० ते १५२ अंतर्गत करण्यात आली आहे. या कलमांनुसार सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि सुविधांवर प्रतिकूल परिणाम घडविणाऱ्या उपद्रवात्मक कृतींवर दंडाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत.
सदर सुनावणीदरम्यान शासकीय कामांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी बंधनकारक असून सार्वजनिक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध नियमितपणे सुनावणी घेवून कठोर कारवाई केली जाईल”, असे श्री पंडा यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond