
मुंबई, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।मुंबई ओलीस प्रकरणावर संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओच्या इमारतीत १७ मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून त्यांना जाळण्याची धमकी देणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी शुक्रवारी हा सगळा धक्कादायक प्रसंग घडला पण आता या प्रकरणाबाबत मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने मोठा खुलासा केला आहे.
मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने या प्रकरणाबाबत तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत भावनिक बाजू उघडकीस आणली. तिच्या पोस्टमध्ये रुचिता जाधव हिने लिहिले, “4 ऑक्टोबरला रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीचा मेसेज मला मिळाला. हा व्यक्ती स्वतःला फिल्ममेकर म्हणत होता आणि त्याने मला एका फिल्म प्रोजेक्टविषयी माहिती दिली. खास गोष्ट म्हणजे ज्याचं फिल्म प्रोजेक्ट त्याने सांगितलं होतं ते होस्टेज सिच्युएशन, म्हणजे बंधकांच्या परिस्थितीवर आधारित होतं.”
रुचिता पुढे म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून मला यात रस आला आणि मी त्याची माहिती ऐकली. 23 ऑक्टोबरला स्वतःला रोहित आर्या सांगणाऱ्या या व्यक्तीने मला 27, 28 किंवा 29 ऑक्टोबरला भेटायची विनंती केली. मी 28 ऑक्टोबरला भेटण्याची वेळ सांगितली. पण 27 ऑक्टोबरला रोहित आर्यने पवईतील एका स्टुडिओची लोकेशन पाठवून भेटीस येण्याची विनंती केली.”
खास गोष्ट म्हणजे रुचिता घरगुती कारणांमुळे ही मीटिंग अटेंड करू शकली नाही आणि ती रोहित आर्य याला भेटायला गेली नाही. त्यानंतर 31 ऑक्टोबरला रुचिताने बातम्यांमध्ये पवई बंधक प्रकरण पाहिले आणि ती स्तब्ध झाली. रुचिता आपल्या पोस्टमध्ये म्हणाली की, या सर्व गोष्टींची कल्पना करूनच अंगावर शहारे उभे राहतात. जर मी त्या दिवशी रोहितला भेटायला गेली असती, तर काय झाले असते? मी देवाचे आणि माझ्या कुटुंबाचे आभारी आहे की मी योग्य वेळेस मीटिंग रद्द केली.पोस्टच्या शेवटी रुचिताने सांगितले की, “ही घटना मला आठवण करून देते की नवीन लोकांशी कामाच्या संदर्भात बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. नेहमी कुटुंबिय किंवा मित्रांना सांगूनच घरून बाहेर पडावे.”
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode