रायगडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अखेर निलंबित
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतील अहवाल आणि त्यातील निरीक्षणांच्या
निलंबन आदेशाने रायगड आरोग्य यंत्रणेत खळबळ; डॉ. विखे म्हणाल्या, “मी निर्दोष आहे”


रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतील अहवाल आणि त्यातील निरीक्षणांच्या आधारे शासनाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे तत्काळ निलंबनाचे आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रे. ज्ञा. सोनटक्के यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार निलंबन आदेश जारी केले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत डॉ. विखे या निलंबित राहणार असून, त्यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई आहे. तसेच निलंबन काळात त्या कोणताही व्यापार, उद्योग किंवा खाजगी नोकरी करू शकत नाहीत. अन्यथा ते गैरवर्तन समजले जाईल, असे आदेशात नमूद आहे.

डॉ. मनीषा विखे या पूर्वी रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची ठाणे येथे बदली झाली असताना त्यांच्या जागी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बदलीविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली आणि मॅटने त्यांना पुन्हा रायगडमध्येच रुजू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती.

निलंबन आदेशानंतर डॉ. विखे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “एका निनावी पत्रावरून माझी चौकशी करण्यात आली, पण मला अहवाल दाखवला नाही किंवा माझे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. मी कोणताही गैरप्रकार केलेला नाही आणि या निर्णयाविरोधात मी आरोग्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे.”

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande