नागपुरीगेट ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पसार झाल्याचे प्रकरणअमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.)पोलीस कोठडीतून आरोपी पसार झाल्याच्या प्रकरणात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता यांच्यासह इरफान रायलीवाले, विक्की नशिबकर आणि मोहन चव्हाण यांना शो-कॉज बजावली आहे तसेच गाडगेनगर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली आहे.
नागपुरी गेट पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात सोमवारी शेखसमीर शेख नवाब (क्य २२) याला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करायचे असल्यामुळे प्रथम त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याला तपास अधिकाऱ्याच्या लेखनीकाच्या स्वाधिन करण्यात आले. दरम्यान तपास अधिकारी व त्यांचा लेखनीक न्यायालयात जाण्याकरिता कागदपत्रे तयार करीत होते आणि आरोपी शेख समीर बाजूला बसलेला होता. दरम्यान काही वेळाने त्याने हातकडी काढली आणि पोलीस ठाण्यातून निघून गेला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच आरोपीच्या शोधार्य पोलिसांची धावपळ सुरू झाली. परंतु सायंकाळपर्यंत त्याचा कुठेच शोध लागला नाही. अखेर रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलिसांनी त्याला दर्यापूर येथील नातेवाईकाच्या घरातून अटक केली. परंतु तपास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा प्रथमदर्शनी दिसून आल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना शो कॉज बजाविली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गाडगेनगर उपविभागाच्या सहाय्यकपोलीस आयुक्तांना दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी