परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि अपमानास्पद वर्तनाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी दिव्यांग एकता संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था तर्फे परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजात अजूनही दिव्यांग व्यक्तींना “लंगड्या, आंधळ्या, बहिऱ्या, खुळ्या” अशा अपमानजनक शब्दांनी संबोधले जाते. हे शब्द दिव्यांगांच्या आत्मसन्मानावर घाव घालणारे असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व दिव्यांग योजनांचे माहिती फलक आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अनिवार्यपणे लावावेत. ऑनलाईन सेवा केंद्रांवर सर्व योजनांची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देऊन दिव्यांगांची आर्थिक फसवणूक थांबवावी. संजय गांधी निराधार व दिव्यांग पेन्शन समित्यांमध्ये दिव्यांग संघटनांचा प्रतिनिधी सदस्य म्हणून समावेश करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गाळे / जागा वाटप करताना दिव्यांगांना आरक्षणानुसार प्राधान्य द्यावे. शासन निर्णय दिनांक 31 डिसेंबर 2020 नुसार दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात याव्यात. जिल्हा परिषदेच्या ५ टक्के शेष निधी योजनांमध्ये कायमस्वरूपी दिव्यांगांना प्राधान्याने लाभ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संस्था अध्यक्ष दत्ता शिंदे, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश शेळके, सोनपेठ तालुका अध्यक्ष सुनील शेरकर, परभणी तालुकाध्यक्ष गोपीनाथ पुंड, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती शेरकर, सोनपेठ महिला अध्यक्ष शितल शिंदे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis