

* भारत-नेपाळ पारगमन मार्गांच्या विस्तारासाठी विनिमय पत्रावर स्वाक्षरी
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) -
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि नेपाळचे उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री अनिल कुमार सिन्हा यांच्यात आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली.
भारत आणि नेपाळ यांच्यात झालेल्या पारगमन कराराच्या मूळ मसुद्यात सुधारणा करत दोन्ही देशांनी विनिमय पत्राचे आदानप्रदान केले. यामुळे जोगबनी (भारत) आणि विराटनगर (नेपाळ) दरम्यान रेल्वे-आधारित मालवाहतूक सुलभ होईल. विस्तारित व्याख्येनुसार मोठ्या मालवाहतुकीचा समावेशही यात आहे. हे शिथिलीकरण कोलकाता-जोगबनी, कोलकाता-नौतनवा (सुनौली) आणि विशाखापट्टणम-नौतनवा (सुनौली) या महत्त्वाच्या पारगमन मार्गांना लागू असेल. दोन्ही देशांमधील बहुआयामी व्यापार संपर्क आणि नेपाळचा तिसऱ्या देशांशी व्यापार यामुळे विस्तारणार आहे.
उपरोक्त विनिमय पत्रामुळे जोगबनी -विराटनगर रेल्वे मार्गावर कंटेनरयुक्त आणि मोठ्या मालासाठी थेट रेल्वे दळणवळण शक्य होणार आहे. यामुळे कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदरांपासून नेपाळमधल्या विराटनगरजवळ मोरंग जिल्ह्यात असलेल्या नेपाळ कस्टम्स यार्ड कार्गो स्थानकापर्यंत वाहतूक सुलभ होईल. हा रेल्वेमार्ग भारत सरकारच्या अनुदान साहाय्यातून बांधण्यात आला असून भारत आणि नेपाळच्या पंतप्रधानांनी 1 जून 2023 रोजी त्याचे संयुक्तपणे उदघाटन केले होते.
एकात्मिक तपासणी चौक्या आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासह सीमापार संपर्क आणि व्यापार सुलभीकरण वाढविण्यासाठी सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचे या बैठकीत स्वागत करण्यात आले. भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार असून नेपाळच्या परदेशी व्यापारात भारताचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. या नवीन उपाययोजनांमुळे दोन्ही देशांमधील आणि त्यापलीकडे आर्थिक व व्यावसायिक संबंध अधिक बळकट होतील अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी