
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) - आयपीएल २०२६ च्या क्रिकेटपटूंच्या लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरला रिलीज केले आहे. शार्दुलची मुंबई इंडियन्सकडून लखनऊला खरेदी करण्यात आली होती आणि आता तो आगामी हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शार्दुलला आयपीएलच्या १८ व्या हंगामात दुखापतीमुळे बदली क्रिकेटपटू म्हणून लखनऊने २ कोटींना खरेदी केले होते.
मुंबई इंडियन्सनेही शार्दुल ठाकूरच्या समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला. संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे की, शार्दुल आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एक विश्वासार्ह सामना जिंकणारा क्रिकेटपटू आहे. त्याच्या आगमनामुळे आमचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होईल आणि संघाला अतिरिक्त अनुभव मिळेल.
गेल्या हंगामात शार्दुलने लखनऊ सुपर जायंटसाठी १० सामने खेळले होते. मुंबईने त्याला लखनऊला 2 कोटींना विकले. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात शार्दुल विकला गेला नाही. पण जखमी मोहसिन खानच्या बदली क्रिकेटपटू म्हणून लखनऊने त्याला विकत घेतले होते. शार्दुल मोहसिनच्या बेस प्राईसवर लखनऊच्या संघात आला होता. शार्दुलने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. पहिल्या दोन सामन्यात 6 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. आणि यामध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या चार विकेट्सचा समावेश होता.
शार्दुलला ही लय कायम राखता आली नव्हती. त्याने १० सामन्यांत ११.०२ च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या होत्या. शार्दुलने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत १०५ सामने खेळले आहेत. त्याने १०७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीसह ३२५ धावांचे योगदान दिले आहे. तो दोन आयपीएल विजेत्या संघांचा भाग आहे. २०१८ आणि २०२१ मध्ये, शार्दुल चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा भाग होता. ज्याने त्या दोन हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
मुंबईच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूला लखनऊ सुपर जायंट्सने लीगच्या १८ व्या हंगामासाठी जखमी क्रिकेटपटूच्या जागी २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. जिथे तो १० सामने खेळला. या अष्टपैलू क्रिकेटपटूला त्याच्या सध्याच्या २ कोटी रुपयांच्या मानधनात मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे