
मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय ग्रँड विटारा एसयूव्ही मॉडेलच्या तब्बल ३९,५०६ युनिट्स तांत्रिक त्रुटीमुळे परत मागवल्या आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत आणि मध्यम ते अप्पर मिडलक्लास ग्राहकांमध्ये मोठा विश्वास असलेल्या या कंपनीने सुरक्षा आणि गुणवत्तेला प्राधान्य देत हा तातडीचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने जाहीर केले की ९ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२५ या काळात तयार झालेल्या मॉडेल्समध्ये स्पीडोमीटर असेंब्लीतील ‘फ्यूल लेव्हल इंडिकेटर’ आणि वॉर्निंग लाईटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे टाकीत किती इंधन शिल्लक आहे याची अचूक माहिती दिसत नाही, ज्यामुळे ड्रायव्हिंगदरम्यान धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन कंपनीने सर्व युनिट्स तातडीने तपासणीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुतीने सांगितले की अधिकृत डिलरशिपकडून ग्राहकांशी थेट संपर्क साधला जाईल आणि त्यांना जवळच्या वर्कशॉपमध्ये मोफत तपासणी व आवश्यक असल्यास भागांचे पूर्ण बदल करण्यात येतील. या प्रक्रियेसाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सुरक्षिततेबाबत जबाबदारीची भावना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीचे हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे. अलीकडेच मारुतीने जीएसटी सुधारणांनंतर ग्रँड विटाराच्या किंमतीत १,०७,००० रुपयांपर्यंत कपात केली होती. सध्या या एसयूव्हीची किंमत १०.७७ लाखांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत २०–२१ लाखांपर्यंत जाते. टोयोटासोबत विकसित केलेली ही फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्ट्रॉन्ग-हायब्रिड पॉवरट्रेन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह पर्यायामुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली असून रिकॉलमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
कंपनीने सर्व वाहनमालकांना विनंती केली आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर वर्कशॉपला भेट देऊन आपल्या गाडीची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून वाहन सुरक्षित आणि योग्य स्थितीत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule