
रायगड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अंदाजे 05.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे शेलू येथील आचार्य कॉलेजमध्ये प्राध्यापक असून त्याच कॉलेजच्या वस्तीगृहाची देखरेखही करतात. नेरळ येथील गुरुकुल वस्तीगृहात राहणारी 16 वर्षे 3 महिन्यांची पिडीत मुलगी घरी महाड येथे जात असल्याचे सांगून हॉस्टेलमधून निघाली.
मात्र ती नंतर घरी न पोहोचल्याची माहिती मिळताच पालक आणि वस्तीगृह प्रशासनाने शोध सुरू केला. मुलगी घरी न गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने नेरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. पिडीत मुलगी वस्तीगृहातही परत न आल्याने तिच्या हालअपेष्टांबाबत संशय निर्माण झाला. या प्रकरणात अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मुलीचे अपहरण केल्याचा फिर्यादीतून आरोप करण्यात आला आहे.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुरनं. 204/2025 असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भा.न्या.सं 2023 मधील कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे नेरळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांसह विविध तपासाच्या दिशा तपासल्या जात आहेत. मुलीचा सुराग मिळावा यासाठी स्थानिक नागरिक, वस्तीगृह प्रशासन आणि पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके