
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी अभिनेत्री दया डोंगरे यांचे आज, सोमवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.
दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च १९४० रोजी झाला होता. त्यांना गायन क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. शालेय जीवनापासून त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीत यांचे प्रशिक्षण घेतले होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगाच्या वेळी गाणं म्हटलं होतं. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यामधून त्यांनी अभिनय केला. ज्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. अवघ्या सोळाव्या वर्षी मो. ग. रांगणेकर यांच्या 'रंभा' या नाटकात त्यांनी पहिलेवहिले काम केले आणि अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव झाला. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचं शिक्षण घेतले. त्यांच्या आई यमुनाताई मोडक या नाट्यअभिनेत्री, आत्या शांता मोडक या गायिका आणि पणजोबा कीर्तनकार असल्याने कलेचा वारसा दया डोंगरे यांना पिढीजात लाभला होता. लग्नानंतरही पती शरद डोंगरे यांच्या पाठिंब्याने त्यांनी कलाक्षेत्रात काम सुरू ठेवले. विशेष म्हणजे शरद डोंगरे यांनीही त्यांची कलेची आवड जपली. लग्नानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या.
१९६४ पासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत त्यांनी १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये ‘गजरा’, ‘बंदिनी’ आणि ‘आव्हान’ यांसारख्या कार्यक्रमांसाठी काम केले. ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले. नाटकांमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा’ (१९८२) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. पुढे ‘दौलत की जंग’ (१९९२) आणि ‘आत्मविश्वास’ (१९८९) सारख्या हिंदी चित्रपटांत दिसल्या.
दूरदर्शनवरील ‘गजरा’ मालिकेमुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. यानंतर त्यांनी ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची’, ‘चार दिवस सासूचे’, ‘कुलदीपक’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूची भूमिक करत नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी’ अशा मालिका आणि नाटकांतही त्यांनी काम केले. त्यांच्या खाष्ट पण मजेशीर सासूच्या भूमिका इतक्या प्रभावी ठरल्या की, त्यांची तुलना हिंदी सिनेमातील ललिता पवार यांच्याशी होऊ लागली. १९९० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला, पण त्यांच्या भूमिकांचा ठसा आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
मराठीसह आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत की जंग अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २०१९ मध्ये नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन दया डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला होता.
दया यांना दोन विवाहित मुली आहेत. मोठी मुलगी संगीता मुंबईत आणि धाकटी अमृता बंगळुरूमध्ये राहते. नातवंडांसह कुटुंबीय नियमित दया यांना भेटण्यासाठी येत असत. पती शरद डोंगरे यांचं २०१४ मध्ये अकस्मात निधन झाले. त्यानंतर दया यांना मोठा धक्का बसला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी