
कोल्हापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील ठेकेदार लक्ष्मी हेरिकॉन प्रा. लि., मुंबई यांना 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. तसेच नाट्यगृहाच्या कामावर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नेमण्यात आला असून तो अभियंता दिवसभर कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याचे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगाने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी आयुक्त कार्यालयात रंगकर्मींसोबत बैठक घेतली. या बैठकीत नाट्यगृहाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून 6 नोव्हेंबर 2025 (गुरुवार) रोजी आर्किटेक्चर कन्सल्टंट, संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. यामध्ये नाट्यगृहाची सर्व कामे जलदगतीने करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे असे सांगितले.
संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम मार्च 2026 अखेरपर्यंत पूर्ण करुन द्यावे अशी मागणी रंगकर्मीच्यावतीने करण्यात आली. याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याची ग्वाही देण्यात आली. नाट्यगृहा शेजारील महापालिकेची जागा पार्किंग व कलादालनासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतली असल्याची माहिती प्रशासकांनी यावेळी दिली. रंगकर्मींच्या विविध शंका निरसनासह एक तासाहून अधिक काळ सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी रंगकर्मींकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर महाब्री, तसेच रंगकर्मी आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण आणि सुनील घोरपडे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar