
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : वाटद-खंडाळा (ता. रत्नागिरी) येथील माध्यमिक विद्यालय भागशाळेच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने रत्नागिरी जिल्ह्याच्या शालेय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत दापोलीतील बेलोसे महाविद्यालयावर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या संघाची कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खंडाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ षटकात ४३ धावा केल्या. यामध्ये सलामीची मनाली नंबरे ९ धावा व सानिया महाकाळ ९ धावा यांनी १८ धावांची सलामी देऊन त्या बाद झाल्या. सानिका आलीम नाबाद १२ धावा व पूजा जाधव हिने नाबाद ७ आणि अवांतर ६ धावा मिळाल्या. दापोली संघाला जिंकण्यासाठी ४४ धावांचे आव्हान पेलले नाही. खंडाळा संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर दापोली संघाला ४ गडी बाद २४ धावाच करता आल्या. मनाली निंबरे, सानिया महाकाळ, निधी डाफळे, पूजा जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. या संघामध्ये मनाली निंबरे, सानिया महाकाळ, सानिका आलीम, पूजा जाधव, जयश्री शितप, निधी डाफळे, दिशा डाफळे, सिद्धी केसरकर, तन्वी सावंत, रिया पावस्कर, आश्लेषा लोकरे, रुताली रामाणे, सलोनी कुरटे, ईश्वरी ढवळे, मृणाली बलेकर, साक्षी खापले हे खेळाडू होते. संघाला क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव, पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी