
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील कोथरूड येथे १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जयेश वाघ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातून अटक केली. हा आरोपी कुख्यात निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोथरूडमधील परिसरात प्रकाश धुमाळ या व्यक्तीच्या गाडीला रस्ता न दिल्याने घायवळ टोळीतील सदस्यांनी प्रथम वाद घातला. हा वाद इतका टोकाला गेला की टोळक्याने धुमाळवर जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात धुमाळ गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे आणि जयेश वाघ या पाच जणांवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत निर्माण करणे आदी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु