
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। नेरळ येथील गणेश घाट परिसरात तळ्याजवळ ऑनलाईन मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना नेरळ पोलिसांनी रंगेहात पकडले. मोबाईलच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुरू असलेल्या या अवैध जुगारावर पोलिसांनी छापा टाकत गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा १८८७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांचे सशक्त नियंत्रण आले आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी पडद्यामागे हे गैरकृत्य सुरू असल्याचे निदर्शनास येत होते. याच पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता गणेश घाट, नेरळ येथे घडली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२५ नोंदविण्यात आला आहे. आरोपी यशवंत जाणू निरगुडा (वय ३२, रा. टपालवाडी, नेरळ), अजय देहु शिंगवा (वय ३३, रा. आनंदवाडी, नेरळ) आणि अनिल धोंडू आखाडे (रा. भडवळ, ता. कर्जत) अशी नावे असून तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी मोबाईल फोनद्वारे ऑनलाईन मटका खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाचा वनप्लस 5G मोबाईल (किंमत ₹13,000) आणि एक पांढऱ्या रंगाचा रियलमी मोबाईल (किंमत ₹2,000) जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये जुगाराशी संबंधित माहिती आणि पुरावे सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोना/१५०९ साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली असून तपास पो.ह.वा./२३४८ वाघमारे हे करीत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे सुरक्षित ठेवले असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके