
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। वर्षअखेरीस मेटा कंपनीने व्हॉट्सअॅपवर एक नवा फीचर पॅक सादर केला असून यामुळे चॅटिंग आणि कॉलिंगचा अनुभव अधिक सहज, स्मार्ट आणि आकर्षक होणार आहे. सुट्ट्यांच्या काळात कुटुंबीय आणि मित्रांशी संवाद वाढतो, हे लक्षात घेऊन संवाद साधणे आणि कंटेंट शेअर करणे अधिक सोपे व्हावे, यावर मेटाने विशेष भर दिला आहे.
नवीन अपडेटनुसार, आता व्हॉट्सअॅपवर कॉल केल्यानंतर समोरचा व्यक्ती लगेच कॉल रिसीव्ह करू शकला नाही, तर मिस्ड कॉलनंतर एका टॅपमध्ये थेट व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवण्याचा पर्याय मिळणार आहे. मेटाच्या मते, हा फीचर पारंपरिक व्हॉइसमेलपेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक अनुभव देणारा आहे. याशिवाय ग्रुप व्हॉइस चॅटमध्ये रिअॅक्शन पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. एखाद्या मजेशीर किंवा महत्त्वाच्या मुद्द्यावर मध्ये न बोलता ‘चिअर्स’सारखा क्विक रिअॅक्शन देणे आता शक्य होणार आहे.
व्हिडिओ कॉल्समध्ये ‘स्पीकर स्पॉटलाइट’ नावाचे अपडेट आणण्यात आले आहे. या फीचरमुळे जो व्यक्ती बोलत असेल, त्याचा व्हिडिओ आपोआप प्राधान्याने दिसेल, त्यामुळे संभाषण समजून घेणे अधिक सोपे होईल. चॅट्समध्ये मेटा एआयची ताकदही वाढवण्यात आली आहे. कंपनीने मिडजर्नी आणि फ्लक्ससारखे प्रगत मॉडेल्स इमेज क्रिएशनसाठी इंटीग्रेट केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हॉलिडे ग्रीटिंग्स किंवा सणासुदीच्या प्रतिमा अधिक दर्जेदार तयार होतील.
इतकेच नाही, तर आता कोणतीही फोटो एआयच्या मदतीने छोट्या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये रूपांतरित करता येणार आहे. हा व्हिडिओ थेट चॅटमध्ये पाठवता येईल किंवा स्टेटसवर शेअर करता येईल. डेस्कटॉप अॅपमध्येही एक नवा मीडिया टॅब देण्यात आला असून, त्यामध्ये डॉक्युमेंट्स, लिंक्स आणि मीडिया एकाच ठिकाणी सॉर्ट होऊन दिसतील. यामुळे फाइल शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. लिंक प्रिव्ह्यू अधिक स्वच्छ आणि स्पष्ट दिसेल, त्यामुळे लांबच लांब यूआरएल मुळे चॅटचा गोंधळ होणार नाही.
स्टेटस आणि चॅनल्समध्येही नवे टूल्स देण्यात आले आहेत. स्टेटसवर आता म्युझिक लिरिक्स, इंटरअॅक्टिव्ह स्टिकर्स आणि ‘प्रश्न’ असे पर्याय उपलब्ध असून, त्यावर थेट प्रतिसाद देता येणार आहे. चॅनल्समध्ये अॅडमिन्सना प्रश्न विचारून प्रेक्षकांकडून रिअल-टाइम प्रतिसाद घेण्याची सुविधाही मिळणार आहे. या सर्व अपडेट्समुळे व्हॉट्सअॅपचा वापर अधिक मजेशीर, संवादात्मक आणि आधुनिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule