भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 14 डिसेंबर (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर सण साजरा करत असलेल्या ज्यू समुदायावर दोन बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख
भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 14 डिसेंबर (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर सण साजरा करत असलेल्या ज्यू समुदायावर दोन बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत या दुःखाच्या काळात भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा असल्याचं म्हणलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले आहे, “आज ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर ज्यू सण हनुक्काच्या पहिल्या दिवशी उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भारताच्या जनतेच्या वतीने, आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या काळात भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे. भारत दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका ठेवतो आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधातील लढ्याला पाठिंबा देतो.”

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर दोन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांपैकी एकाला ठार केले असून, दुसऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. तो गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी एका हल्लेखोराची ओळख पटवली असून, त्याचे नाव 24 वर्षीय नविद अकरम असे आहे. तो सिडनीचा रहिवासी असून, पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आहे.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेला धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले असून या गोळीबाराला दहशतवादी हल्ला घोषित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande