तामिळनाडू निवडणुकीसाठी भाजपाचे पियुष गोयल प्रभारी, मुरलीधर मोहोळ सहप्रभारी
नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने २०२६ मध्ये होणाऱ्या तामिळनाडू आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग देत सोमवारी दोन्ही राज्यांसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची जबाबदारी वाणिज्
Piyush Goyal Muralidhar Mohol


नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने २०२६ मध्ये होणाऱ्या तामिळनाडू आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग देत सोमवारी दोन्ही राज्यांसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची जबाबदारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या सोबत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि केंद्रीय सहकारिता व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सह-प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे.

तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि डीएमके पुन्हा एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी काँग्रेसने २२ नोव्हेंबर रोजी पाच सदस्यीय समितीची घोषणा केली असून ही समिती जागावाटप आणि आघाडीचा रोडमॅप तयार करणार आहे. राज्यात २०२६ मध्ये एप्रिलच्या अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता आहे. याआधी २००१ मध्येही काँग्रेस आणि डीएमके यांनी एकत्र निवडणूक लढवून सरकार स्थापन केले होते.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमधील २३४ जागांपैकी डीएमके ने १५९ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता, तर काँग्रेसने २५ पैकी १८ जागांवर यश मिळवले होते. या विजयामुळे दहा वर्षांनंतर डीएमके सत्तेत परतली आणि एम. के. स्टालिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. याशिवाय, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-डीएमके युतीने तामिळनाडूमधील सर्व ३९ जागांवर विजय मिळवला होता. त्यापैकी काँग्रेसने ९ जागा जिंकल्या होत्या.

दरम्यान, आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजप खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सह-प्रभारी म्हणून जम्मू-काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील कुमार शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री दर्शनाबेन जरदोश यांची निवड करण्यात आली आहे. आसाममध्ये सध्या भाजप सत्तेत असून हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्री आहेत.

आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा असून २०२६ मध्ये सर्व जागांसाठी निवडणूक होणार आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने ७५ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती, तर काँग्रेस आघाडीला सुमारे ५० जागा मिळाल्या होत्या. त्या निकालानंतर हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्री बनले होते. आता २०२६ च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून तामिळनाडू आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande