
सरकारला एक वर्ष होताच पडली पहिली विकेट
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)। - महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री म्हणून समोर आलेले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिक कोकाटे यांनी शेवटी बुधवारी रात्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे दिला आहे. यामुळे महायुती सरकारमधील आरोप होत असलेल्या मंत्र्यांमधील पहिली विकेट पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांनी पक्ष प्रमुख या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा पत्र दिले. त्यानंतर कोकाटे यांचं मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली. दरम्यान क्रीडा विभागाचा अतिरिक्त कार्यभार तूर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, कोकाटे यांच्या जागी कोणाला मंत्री पद द्यायचे याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारच घेतील.
महाराष्ट्र मध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीचे सरकारचे एक वर्ष पूर्ण होत असतानाच महत्त्वपूर्ण घडामोडी झालेली आहे. वारंवार कृषिमंत्री आणि त्यानंतर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री असलेले नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आमदार माणिक कोकाटे यांच्यावरती सतत वेगवेगळे आरोप करण्यात आले त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात होते एक वर्षांमध्ये माणिक कोकाटे यांचे कृषी खते काढून त्यांना युवक व क्रीडा कल्याण मंत्री असे खाते देण्यात आले यादरम्यानही त्यांचे वादग्रस्त वक्तव्य हे सुरू होते. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी थेट भाजपा आणि संघ परिवारा वरती देखील सिन्नर येथे जाहीर सभेमध्ये बोलताना आरोप केलेले होते त्यांचे भाऊ हे भाजपामध्ये सहभागी झाले आहे.
तीस वर्षांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्री कोट्यातील सदनिके प्रकरणात खोटे कागदपत्र सादर केले त्यामुळे तत्कालीन कोकाटे यांचे विरोधक माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केलेली होती या सर्व तक्रारीमध्ये विश्वनाथ पाटील या उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्याचा निकाल हा फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिला होता त्यामध्ये माणिक कोकाटे व त्यांचे भाऊ यांना दोन वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावरती जिल्हा न्यायालय मध्ये माणिक कोकाटे यांनी अपील केलेले होते या अपील मध्ये जिल्हा न्यायाधीशांनी शिक्षा कायम ठेवली त्यानंतर आज बुधवारी या प्रकरणांमध्ये कोकाटे यांच्या विरोधात अटक वारट जारी करण्यात आले. तर आज बुधवारी दिवसभरात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन व इतर स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यात यश न आल्याने ते नानावटी रुग्णालयामध्ये प्रकृती बिघडल्यामुळे दाखल झाले. या सर्व घडामोडी घडत असतानाच कोकाटे यांनी बुधवारी उशिरा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे याबाबत पक्षाच्या वतीने देखील कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV