
नागपुर, 19 डिसेंबर (हिं.स.) : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी फेस-2 येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज, शुक्रवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. प्लांट परिसरातील पाण्याची मोठी टाकी अचानक फुटल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती आहे, आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवले जात आहे. मृत कामगारांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.ही दुर्घटना औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षिततेला एक गंभीर प्रश्न उपस्थित करते. संबंधित प्लांटच्या व्यवस्थापनाकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, मात्र प्रशासनाने घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे.या दुर्घटनेमुळे स्थानिक औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे आणि कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औद्योगिक सुरक्षा मानके आणि नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांवर अधिक कडक नियम लागू करणे आवश्यक आहे, असा आक्षेप व्यक्त केला जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी