
नवी दिल्ली, 19 डिसेंबर (हिं.स.) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज आज, शुक्रवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांत या अधिवेशनादरम्यान चांगली चर्चा झाली. या अधिवेशनातील मुख्य मुद्दा जी राम जी विधेयक होता, जो दोन्ही सभागृहांतून मंजूर झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे अधिवेशन यशस्वी ठरल्याचे सांगितले असून, 111 टक्के उत्पादकता साध्य झाल्याचे नमूद केले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी संपले. या काळात गोंधळाची परिस्थिती असूनही राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांत सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा जी राम जी विधेयक ठरला, जो राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांतून मंजूर करण्यात आला.राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांची कामकाजे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहेत. आता संसदेचे पुढील अधिवेशन 2026 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या रूपाने सुरू होईल.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 18व्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा करत हे अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की या अधिवेशनात एकूण 15 बैठका यशस्वीरीत्या पार पडल्या.लोकसभा अध्यक्षांनी पुढे सांगितले की सभागृहातील सर्व सदस्यांनी या अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला आणि सहकार्य केले. काही सदस्यांनी महत्त्वाच्या प्रसंगी उशिरापर्यंत काम केले. ओम बिर्ला यांनी नमूद केले की या अधिवेशनात लोकसभेने 111 टक्के उत्पादकता गाठली.
लोकसभेच्या अठराव्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. त्यामध्ये विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) विधेयक 2025 (व्हीबी-जी-राम-जी बिल) याचा समावेश आहे, जे मनरेगाच्या जागी लागू करण्यात आले आहे. राज्यसभेत या हिवाळी अधिवेशनादरम्यान 92 तास कामकाज झाले असून, 121 टक्के उत्पादकता साध्य झाली.या अधिवेशनात विविध विषयांवरील मागण्यांसाठी मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये वायू प्रदूषण तसेच विमा कायद्यातील सुधारणा यांवरील चर्चेचा समावेश होता. प्रलंबित कामकाज निकाली काढण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी उशिरापर्यंत काम केले.
राज्यसभेचे 269वे अधिवेशन आज शुक्रवार रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले. अधिवेशन समाप्तीच्या घोषणेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभागृह नेते जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच सर्व सदस्यांचे त्यांच्या अभिनंदन व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.सी. पी. राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उच्च सभागृहाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले हे त्यांचे पहिलेच अधिवेशन होते. त्यांनी सांगितले की या अधिवेशनात अनेक उल्लेखनीय कामे झाली. त्यामध्ये दररोज सरासरी 84 पेक्षा अधिक शून्यकाल नोटिसांचा अभूतपूर्व आकडा नोंदवण्यात आला, जो मागील दोन अधिवेशनांच्या तुलनेत 30.1 टक्क्यांनी अधिक आहे. शून्यकालादरम्यान दररोज 15 पेक्षा अधिक मुद्दे उपस्थित करण्यात आले, ज्यामुळे सुमारे 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी