रत्नागिरीतील कलाकारांनी ५० तासांत साकारलेला चित्रपट जगातील ‘सर्वोत्कृष्ट २५’मध्ये
रत्नागिरी, 2 डिसेंबर, (हिं. स.) : नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म प्रोजेक्ट फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीतील कलाकारांनी साकारलेल्या ''डुन्नू'' या चित्रपटाची ''टॉप २५''मध्ये निवड झाली आहे. रत्नागिरीतील ''दी लास्ट टेबल स्टुडिओ''ची निर्मिती
डुन्नू


रत्नागिरी, 2 डिसेंबर, (हिं. स.) : नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म प्रोजेक्ट फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीतील कलाकारांनी साकारलेल्या 'डुन्नू' या चित्रपटाची 'टॉप २५'मध्ये निवड झाली आहे.

रत्नागिरीतील 'दी लास्ट टेबल स्टुडिओ'ची निर्मिती असलेल्या या फिल्मला रौप्यपदकाने गौरवण्यात आले. मुंबईतील सुप्रसिद्ध मेहबूब स्टुडिओमध्ये २९ आणि ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अभिषेक बच्चन, शाहीद कपूर, नवाझुद्दीन सिद्दिकी, अनन्या पांडे यांच्यासह दिग्दर्शक अनुराग बसू, अनुभव सिन्हा आणि रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

इंटरनॅशनल फिल्म प्रोजेक्ट फेस्टिव्हलचा यंदा १५वा सीझन होता. 50 hours filmmaking challenge अर्थात ५० तासांमध्ये चित्रपट बनवण्याची स्पर्धा त्यात आयोजित केली जाते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दिलेल्या विषयावर संकल्पना, कथा-पटकथा, कलाकार आणि चित्रीकरण स्थळाची निवड, चित्रिकरण, फिल्मचे संकलन-संपादन, गाणी, संगीत असे सगळे टप्पे केवळ ५० तासांमध्ये पूर्ण करून तयार झालेला चित्रपट स्पर्धेसाठी सादर करावा लागतो. यंदा या स्पर्धेत जगभरातील २३ देशांतील ३५० शहरांमधून ४० हजारांहून अधिक फिल्म्स सहभागी झाल्या होत्या. त्यातून रत्नागिरीतील 'दी लास्ट टेबल स्टुडिओ'च्या 'डुन्नू' या फिल्मची 'सर्वोत्कृष्ट २५'मध्ये निवड झाली. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रत्नागिरीतील 'अनबॉक्स'चे गौरांग आगाशे आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचेचे धीरज पाटकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात नवा तुरा खोवला गेला असून, या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

'डुन्नू' फिल्मची श्रेयनामावली अशी :

लेखन-दिग्दर्शन : सुमित मालप

सहदिग्दर्शक : मयूर दळी

व्हिडिओ एडिटिंग : निखिल पाडावे, मयूर दळी

छायाचित्रण : साईप्रसाद पिलणकर, सिद्धराज सावंत

गीत : केतकी चैतन्य

संगीत व गायन : ओंकार बंडबे

म्युझिक अरेंजर : पंकज घाणेकर

लाइन प्रोड्युसर : ऋत्विक सनगरे

भूमिका : विष्णू आशिष घाणेकर, गंधार तपन मलुष्टे, रियांश चेतन साखरपेकर, गणेश राऊत, सुनील बेंडखळे, शमिका घाणेकर, मयूर दळी

निर्मिती : दी लास्ट टेबल स्टुडिओ

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande