रत्नागिरी : खल्वायनच्या 323 व्या मासिक संगीत सभेत डॉ. राधिका जोशी यांचे गायन
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेच्या 323 व्या मासिक संगीत सभेत शनिवारी, दि. 14 मार्च 2026 रोजी पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांचे शास्त्रीय तसेच अभंग - नाट्य गीत गायन होणार आहे. नेहमीप्रमाणेच ही संगीत सभा शनिवा
डॉ राधिका जोशी


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेच्या 323 व्या मासिक संगीत सभेत शनिवारी, दि. 14 मार्च 2026 रोजी पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांचे शास्त्रीय तसेच अभंग - नाट्य गीत गायन होणार आहे.

नेहमीप्रमाणेच ही संगीत सभा शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार असून कै. अरुअप्पा जोशी स्मृती संगीत मैफल म्हणून ती मैफील साजरी होणार आहे. डॉ. राधिका जोशी जयपूर-अत्रौली घराण्याच्या एक उदयोन्मुख व प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांहून अधिक काळ तालीम घेतली आहे. त्यांनी पद्मविभूषण गिरिजा देवीजी यांच्याकडूनही उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. राधिका यांना नुकताच गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार म्हणून डॉ. राधिका जोशी यांनी भारतभरातील अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर आपली कला सादर केली आहे. यामध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटर, रझा फाउंडेशन, सुबह-ए-बनारस, उस्ताद अब्दुल करीम खान स्मृती समिती, देवल क्लब, लोणावळा-खंडाळा संगीत संमेलन, बेंगळुरू इंटरनॅशनल सेंटर इत्यादी प्रमुख संस्थांचा समावेश आहे.

डॉ. राधिका जोशी ‘जयपूर गुणिजनखाना’ या पुण्यातील जयपूर अत्रौली घराण्याच्या संग्रहालयाच्या संस्थापक आहेत. ही संस्था हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दस्तावेजीकरण व संवर्धनासाठी कार्यरत आहे. त्यांनी अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठ (बॉस्टन) येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (बेंगळुरू) येथून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. 2022 पासून त्यांनी स्वतःला पूर्णवेळ शास्त्रीय संगीताच्या साधनेस वाहून घेतले आहे.

त्यांच्या रत्नागिरीतील मैफलीला तबला साथ सोहम जोशी (दापोली) व हार्मोनियम साथ अमित ओक (चिपळूण) हे नामवंत वादक करणार आहेत. या मैफलीला उपस्थित राहून गायनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande