
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण शाखेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या गायनाचा स्वर तरंग हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, तसेच गायिका उत्तरा भागवत-साडविलकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठीची निवड प्रक्रिया दि. ४ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवड प्रक्रियेत एकूण २६ महिला तसेच काही गटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून सतीश कुंटे, राहुल साडविलकर आणि कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर यांनी काम पाहिले. या प्रक्रियेतून एकूण १६ महिलांची अंतिम निवड करण्यात आली.
प्रथमच स्थानिक महिलांसाठी अशा प्रकारचा गायनाचा कार्यक्रम नाट्य परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असून निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री. कुंटे यांनी सहभागी महिलांना मोलाचे मार्गदर्शनही केले.
स्थानिक महिलांच्या गायनाच्या होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी