
बीड, 20 डिसेंबर (हिं.स.)दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड जिल्ह्याच्या काही तालुक्यात वेळ आमवस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावात ग्रामदेवतेची पुजा आणि शेतात कडब्याच्या झोपडीत पांडवांची पुजा करण्यात आली. या प्रसंगी शेतकऱ्यांनी कुटूंबातील सदस्य व आमंत्रीतांसोबत विविध प्रकारच्या भाज्यांपासून बनविलेली भजी, खीर, आंबिल, ज्वारी, बाजरीचे उंडे, आंबट भाताच्या प्रसादाचा आस्वाद घेतला.
रब्बी हंगामाच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी वेळ आमवस्या करतात. या सणात निसर्गाची हानी होत नाही. उलट माणूस निसर्गाच्या जवळ जातो. निसर्गाशी नाते घट्ट होते. गहू, हरभरा, तूर, ज्वारी, फुलांनी सजलेली शेती, प्रसन्न वातावरण, ऊन, वारा, पावसासमोर नतमस्तक होऊन शेतकरी निसर्गपूजा करतो. ही परंपरा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे.कडब्याच्या कोपीत पिकांची व मातीच्या पांडवांची पूजा करण्यात आली. नैवेद्य दाखवून वनभोजन करण्यात आले. आंबील, घुगऱ्या, कांदा, भज्जी या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची चव वेळ आमवस्याच्या निमित्ताने चाखायला मिळते. यासाठी शहरातील नागरीकही कुटूंबासह आप-आपल्या गावी आले होते. बच्चेकंपनीने बोरे, तुरीच्या शेंगा, ऊस, हरभऱ्याचे डहाळे या रानमेव्याचा आनंद घेतला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis