मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्र काँ
INC MUMBAI


मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करत सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली.

चेन्निथला यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाणीवपूर्वक टाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच आता ही निवडणूक होत आहे. सरकारने थेट महानगरपालिका चालवली असून प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप केला. संविधानात दुरुस्ती असूनही निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. जर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता, तर पुढील पाच वर्षेही अशीच गेली असती, असा आरोप त्यांनी केला आणि न्यायालयाचे आभार मानले.

या काळात काँग्रेसने प्रदूषण, रुग्णालयांची अवस्था, भ्रष्टाचार आणि नागरी समस्यांवर सातत्याने आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. आजही मुंबईतील सर्वसामान्य नागरिक, गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून मदत मिळत नाही. महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस भाजपविरोधात तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेविरोधातही लढणार असून खरे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक काँग्रेससोबत यावेत, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस लवकरच आपला जाहीरनामा सादर करेल आणि मुंबई महापालिका सक्षमपणे चालवण्याची जबाबदारी घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी भाजपवर धार्मिक राजकारणाचा आरोप केला. निवडणुका आल्या की भाजप धार्मिक मुद्दे पुढे करतो, मात्र सत्तेत राहण्यासाठी दुटप्पी भूमिका घेतो, असे त्या म्हणाल्या. नवाब मलिक यांच्यावर टीका करणारेच नेते त्यांच्या कुटुंबियांबाबत वेगळी भूमिका घेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईकर या धार्मिक राजकारणाला बळी पडणार नसून रस्ते, वाहतूक कोंडी, स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवा यांसारख्या नागरी प्रश्नांवर मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य छोट्या पक्षांचे प्रतिनिधी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केल्याने, आगामी निवडणुकीत संभाव्य आघाडीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली असली, तरीही वंचितसाठी दरवाजे उघडे असल्याचे संकेत मिळत असून पुढील काळात राजकीय समीकरणे कशी जुळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande