नागपूरच्या १५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष
नागपूर , 21 डिसेंबर (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. एकूण १५ नगरपालिका आणि १२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झा
देवेंद्र फडणवीस


नागपूर , 21 डिसेंबर (हिं.स.) ।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. एकूण १५ नगरपालिका आणि १२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून, १५ पैकी तब्बल १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या निकालामुळे नागपूर जिल्ह्यात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे वर्चस्व, विरोधकांना मर्यादित यश

या निवडणुकांमध्ये केवळ एका नगरपालिकेत काँग्रेसला, एका ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एका नगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट) ला यश मिळाले आहे. उर्वरित सर्व ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

स्वतंत्र लढतीतही भाजप सरस

नागपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. मात्र प्रत्यक्षात प्रमुख सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असाच होता. काही नगरपालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली.

‘एकला चलो रे’ धोरणाला यश

भाजपने निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार केला होता. निवडणूक निकालांनी भाजपची ही रणनीती यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे नगराध्यक्ष कामठी, सावनेर, उमरेड, खापा, वाडी, कळमेश्वर यांच्यासह इतर नगरपालिकांमध्ये निवडून आले आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काटोल नगरपालिकेत अध्यक्षपद पटकावले आहे, तर शिवसेना (शिंदे गट) ने रामटेकचा गड राखण्यात यश मिळवले आहे.

कामठीत भाजपला ऐतिहासिक यश

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपला प्रथमच यश मिळाले आहे. दलित आणि मुस्लिम मतांमध्ये झालेल्या विभाजनामुळे भाजपचा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या विजयासोबतच कामठीत भाजपविरोधात असलेले जनमतही प्रकर्षाने समोर आले आहे.

सावनेरमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का

सावनेर नगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिकेतही काँग्रेसला अपयश आल्याने पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

आगामी राजकारणासाठी महत्त्वपूर्ण निकाल

नागपूर जिल्ह्यातील हे निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या निकालांमुळे जिल्ह्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande