
अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय विजय ठरला आहे. तसेच जनतेने भाजपचे दावे फेल ठरवले आहेत, अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे खासदार व काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांनी दिली आहे.
नगरपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांनी एक खळबळजनक विधान मांडले. ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या संपू्र्ण प्रचारात सक्रिय होते. जिल्ह्यात ‘कमळ आणि कमळच’ राहणार, असे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र चिखलदरा, दर्यापूरसह विविध ठिकाणी भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे.
अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेसचा उमेदवार अवघ्या ७९ मतांनी मागे असून, तेथे पुन्हा मतमोजणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हा विजय जनतेचा असून, भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा वापरून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही वानखडे यांनी केला.
चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अविरोध निवडून यावेत यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपने सर्व जागा जिंकण्याचा दावा करत लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला, मात्र तेथील जनशक्तीने भाजपचे मनसुबे उधळून लावले.
आज चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता असून, मोठ्या मताधिक्याने सर्व उमेदवार निवडून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विजय जनतेच्या ताकदीचा आणि भाजपच्या अहंकाराविरुद्धचा असल्याचे खासदार वानखडे यांनी ठामपणे सांगितले.
-----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी