
नवी दिल्ली , 23 डिसेंबर (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसूर्या यांची भेट घेऊन ‘दित्वाह’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर देशाच्या पुनर्बांधणीसाठी भारताची पूर्ण बांधिलकी असल्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून जयशंकर दोन दिवसांच्या दौऱ्यावर श्रीलंकेत दाखल झाले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर जयशंकर यांनी म्हटले की भारत आणि श्रीलंका यांच्यात खोल ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध आहेत आणि या आपत्तीच्या काळात भारत ठामपणे श्रीलंकेच्या पाठीशी उभा आहे. भारताकडून देण्यात येणारे पुनर्बांधणी पॅकेज हे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि मैत्रीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ आणि राष्ट्रपती अनुर कुमारा दिसानायके यांच्या उपस्थितीत जयशंकर यांनी उत्तरी प्रांतातील किलिनोच्ची जिल्ह्यात १२० फूट लांबीच्या ड्युअल कॅरिजवे बेली ब्रिजचे उद्घाटन केले. हा परिसर ‘दित्वाह’ चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक आहे. ११० टन वजनाचा हा पूल भारतातून हवाई मार्गाने आणण्यात आला असून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत उभारण्यात आला आहे.
यापूर्वी जयशंकर यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचीही भेट घेऊन पंतप्रधान मोदी यांच्यावतीने संवेदना आणि एकजुटीचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की भारत श्रीलंकेला ४५० दशलक्ष डॉलर्सचे पुनर्बांधणी पॅकेज देणार असून, त्यात रस्ते, रेल्वे आणि पूल दुरुस्ती, नुकसानग्रस्त घरांचे पुनर्निर्माण, आरोग्य व शिक्षण क्षेत्राला मदत, कृषी क्षेत्राला पाठबळ आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करण्याचा समावेश आहे. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाअंतर्गत आणि ‘विजन महासागर’च्या माध्यमातून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode