
भाजपवर संविधानाच्या मूळ भावनेला कमकुवत केल्याचा आरोपनवी दिल्ली, २३ डिसेंबर (हिं.स.)जर्मनीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर भारतीय संविधानाच्या मूलभूत भावनेला कमकुवत करण्याचा, कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजप संविधानात समाविष्ट असलेल्या समान हक्क, राज्यांची समानता, भाषिक विविधता आणि धार्मिक समानता या संकल्पना नष्ट करू इच्छित आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री बर्लिनमधील हर्टी स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुमारे एक तासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी लोकशाही, संस्था आणि जागतिक परिस्थितीबद्दल त्यांचे विचार मांडले.ते म्हणाले की, भारतातील लोकशाही संस्था स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या संस्था विरोधकांविरुद्ध राजकीय शस्त्र म्हणून वापरल्या जात आहेत. काँग्रेसचा लढा केवळ भाजपविरुद्ध नाही तर संस्थात्मक संरचना आणि एजन्सींवर कथितपणे ताबा मिळवण्याच्या विरोधातही आहे.
राहुल गांधींनी असा दावा केला की, भारतातील हरियाणा राज्यातील मतदार यादीत एका परदेशी महिलेचे नाव असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, पण निवडणूक आयोगाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल म्हणाले की, भारतात व्यापक रोजगार निर्मितीसाठी मजबूत उत्पादन क्षेत्र आवश्यक आहे. भाजप सरकारने काही मोठ्या औद्योगिक गटांना प्राधान्य दिले. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर यासारख्या धोरणांमुळे लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचे नुकसान झाले आहे.राहुल गांधी म्हणाले की, भारत हा इतका मोठा आणि वैविध्यपूर्ण देश आहे की, त्याचे भविष्य कोणत्याही एका व्यक्तीद्वारे ठरवता येत नाही. संविधान भारताला राज्यांचे संघ म्हणून मान्यता देते. पण सध्याचे सरकार यावर व्यापक चर्चेसाठी तयार नाही.----------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे