
नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या प्राचीन जहाजबांधणी आणि दर्यावर्दी परंपरांचे पुनरुज्जीवन करणारे भारतीय नौदलाचे पहिले 'टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले, शिडाचे आयएनएसव्ही कौंडिण्य, हे जहाज 29 डिसेंबर 2025 रोजी आपल्या पहिल्या परदेश प्रवासासाठी रवाना होईल. प्राचीन काळापासून भारताला हिंद महासागराशी जोडणाऱ्या ऐतिहासिक सागरी मार्गांचा प्रतीकात्मक मागोवा घेण्यासाठी या जहाजाला गुजरात मधील पोरबंदर येथून मस्कत, ओमानच्या दिशेने झेंडा दाखवून रवाना केले जाईल.
प्राचीन भारतीय जहाजांच्या चित्रणातून प्रेरणा घेतलेले आणि संपूर्णपणे पारंपरिक 'स्टिच्ड-प्लँक' तंत्राचा वापर करून बांधलेले 'आयएनएसव्ही कौंडिण्य' हे जहाज इतिहास, हस्तकला आणि आधुनिक नौदल कौशल्याचा एक दुर्मिळ संगम आहे. समकालीन जहाजांच्या विपरित पद्धतीने, याच्या लाकडी फळ्या नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या दोरीने एकत्र शिवल्या आहेत आणि नैसर्गिक राळेने सील केल्या आहेत. हे तंत्र एकेकाळी भारताच्या किनारपट्टीवर आणि संपूर्ण हिंद महासागरात प्रचलित असलेल्या जहाजबांधणी परंपरेचे प्रतिबिंब आहे. आधुनिक नौकानयन आणि धातुशास्त्र अस्तित्वात येण्यापूर्वी, याच तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय दर्यावर्दी पश्चिम आशिया, आफ्रिका आणि आग्नेय आशियापर्यंत लांब पल्ल्याचा प्रवास करू शकत होते.
पारंपरिक प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेले जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल, आयएनएसव्ही कौंडिण्य असे जहाजाचे नामकरण
भारताची स्वदेशी ज्ञान प्रणाली शोधून काढण्याच्या आणि तिचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराद्वारे हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. मुख्य जहाजबांधणी तज्ज्ञ बाबू संकरन यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक कारागिरांनी हे जहाज बांधले असून, भारतीय नौदल आणि शैक्षणिक संस्थांच्या व्यापक संशोधन, रचना आणि चाचण्यांच्या मदतीने त्याची बांधणी केली आहे. हे जहाज पूर्णपणे समुद्रमार्गे प्रवासासाठी योग्य असून महासागरात नौकानयन करण्यास सक्षम आहे. प्राचीन काळी भारतातून आग्नेय आशियात प्रवास केल्याचे मानले जाणाऱ्या कौंडिण्य या पौराणिक दर्यावर्दीचे नाव या जहाजाला देण्यात आले असून, हे जहाज एक सागरी राष्ट्र म्हणून भारताच्या ऐतिहासिक भूमिकेचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule