
रायगड, 23 डिसेंबर, (हिं.स.)। हरित सेना महाराष्ट्र सामाजिक वनीकरण, म्हसळा वनक्षेत्र यांच्या वतीने सरवर रोपवाटिका येथे देवघर हायस्कूलमधील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी रोपवाटिकेचे फायदे व महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने ही कार्यशाळा संपन्न झाली .
कार्यशाळेत रेंजर पी. एस. पाटील यांनी आपल्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना रोपवाटिकेचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि त्यातून होणारे पर्यावरणीय लाभ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. झाडांची लागवड व संगोपन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी केवारी भाऊसाहेब यांनी रोपवाटिकेमध्ये असलेल्या विविध प्रजातींची माहिती देत प्रत्येक झाडाचे उपयोग, वाढीची प्रक्रिया आणि पर्यावरणातील योगदान स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेत अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना भिमराव सूर्यतळ यांच्या वतीने पेन देऊन गौरविण्यात आले.
रोपवाटिका कुठे असावी, पाण्याची उपलब्धता, रस्त्याची सोय, सपाट जमीन, मातीची निवड तसेच शेणखताचे महत्त्व याविषयी आकाश गायकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या माहितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोपवाटिका उभारणीबाबत मूलभूत ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाला संजय मुंडे, ट्रेझरी अधिकारी वाल्मिक सुतार, शिक्षक जाधव सर, अभि जाधव, पाटील सर यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण होऊन वृक्षलागवडीसाठी प्रेरणा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके