
महायुतीचेही जागावाटप अंतिम टप्प्यात
मुंबई, 23 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असून ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या, २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युती तसेच मुंबईतील जागावाटपाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या घोषणेकडे लागलं आहे.
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येत असल्याने ठाकरे गटाची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली असून, त्यामध्ये अंतिम चर्चा पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्या दोन्ही प्रमुख नेते एकत्र येऊन युती आणि जागावाटपाची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं की शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही युती मनापासून स्वीकारली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नसून, तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागले असून, मनोमिलन झालं आहे. जागावाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवण्यात आला असून, युती प्रत्यक्षात आधीच झाली आहे, केवळ अधिकृत घोषणाच बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.वरळीतील डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच ही युती प्रत्यक्षात साकार झाली होती, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. आता केवळ त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्याची पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम राज्यातील इतर महापालिकांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 145 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 65 ते 70 जागा येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी 10 ते 12 जागा सोडण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे ठाकरे गटाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास 12 ते 15 जागा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील बहुतांश माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाकडे तुल्यबळ उमेदवार नाही. तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. परंतु, अद्याप भांडूप, कांदिवली, बोरिवली, मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा बराच काळ लांबला होता. हा तिढा सुटून संपूर्ण जागावाटप निश्चित झाल्यानंतरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आग्रह होता.संपूर्ण जागावाटप निश्चित होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करु नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही दिल्या होत्या. दोन्ही बाजूंनी जागावाटपाचा निर्णय अंतिम होऊ दे. आपल्याला ज्या जागा हव्या आहेत, त्या मिळत नाहीत तोपर्यंत युतीची घोषणा करु नये, अशी राज ठाकरे यांची भूमिका होती.
महायुतीचेही जागावाटप अंतिम टप्प्यात
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीतील युतीच्या अभूतपूर्व यशानंतर महानगरपालिकांना सामोरे जाण्यासाठी एकदिलाने काम करू. नागरिकांना महाराष्ट्र बदलतो आहे, प्रगतिपथावर आहे याची हमी देण्यासाठी जागावाटप चर्चा फार न लांबवता, त्याला फाटे न फोडता एकीचे वातावरण जनतेपर्यंत पोहोचवावे असा निर्णय भाजप बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule