
जळगाव, 24 डिसेंबर (हिं.स.) | जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनिक विशेष गाडीचा कालावधी वाढवला आहे. आता ही गाडी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावेल. सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने याआधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिसूचित केलेल्या या गाडीची मुदत वाढवली.
०९२११ बडनेरा – नाशिक रोड ही गाडी पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत धावणार होती. ती आता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज धावेल. ०१२१२ नाशिक रोड बडनेरा ही गाडी परतीच्या प्रवासासाठी सुद्धा १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धावेल. म्हणजेच दोन महिन्यात एकूण ५९ फेऱ्या होतील. कालावधीत वाढवताना या गाडीचे वेळापत्रक, डब्यांच्या संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही.जळगाव येथून नाशिक व शेगाव येथे जाण्यासाठी ही गाडी अंत्यत सोयीची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक यागाडीने प्रवास करीत असतात. ही गाडी सकाळी १०.०५ वाजता बडनेरा येथून सुटते. १०.३० मूर्तिजापूर, १०.४९ बोरगाव, ११.०२ अकोला, ११.३३ शेगाव, दुपारी १२.०३ नांदुरा, १२.३८ मलकापूर, १.३७ बोदवड, ३.०५ भुसावळ, ३.३५ जळगाव, ४.०६ पाचोरा, ४.१९ कजगाव, सायंकाळी ४.३९ चाळीसगाव, ५.२० नांदगाव, ५.५० मनमाड, ६.०६ लासलगाव, ६.२५ निफाड, ७.०५ नाशिक रोड स्थानकावर येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर