
रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वे स्थानकावर जामनगर व पोरबंदर येथून धावणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे बोर्डाने या गाड्यांना संगमेश्वरला थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना गुजरात, सौराष्ट्र भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने यापूर्वी तीन वेळा केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केले होते. नागरिकांनीही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र अंतिम निर्णय प्रलंबित होता. निसर्गरम्य संगमेश्वर चिपळूण संस्थेचे संदेश जिमन, बेलवलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या चिपळूण, संगमेश्वर येथे झालेल्या जनता दरबारात हा प्रश्न मांडला होता. श्री. राणे यांनी हा विषय गांभीर्याने घेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी थेट चर्चा करत, संगमेश्वर रोड स्थानकाचे महत्त्व, प्रवासी संख्या, व्यापारी व चाकरमान्यांच्या गरजा तसेच कोकणातील वाढती वाहतूक याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
थांबा मंजूर झालेल्या गाड्यांमध्ये दोन गाड्या आता संगमेश्वर स्थानकावर थांबतील. त्यामध्ये जामनगर – तिरुनेलवेली एक्स्प्रेस (गाडी क्र. 19578/19576) आणि पोरबंदर – तिरुअनंतपुरम एक्स्प्रेस (गाडी क्र. 20910/20909) यांचा समावेश आहे. तर मंजूर दोन गाड्यांपैकी पोरबंदर तिरुअनंतपुरम ( पूर्वीची कोचुवली ) ही गाडी (20910) 25 डिसेंबर रोजी सुटणार असून संगमेश्वर थांबा घेणार आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ही गाडी प्रत्यक्ष 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता येईल.
या निर्णयामुळे संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी