
- मुंबईचा महापौर हा मराठीच असणार - राज ठाकरे
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर बुधवारी अधिकृतपणे जाहीर झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनसे–ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. या युतीअंतर्गत दोन्ही पक्ष मुंबईसह राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. त्यामुळे या युतीला भावनिक आणि राजकीय दोन्ही अंगांनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना–मनसेची युती झाल्याची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आपल्या एका मुलाखतीत केलेल्या या वक्तव्यापासूनच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे त्यांनी नमूद केले. जागावाटपाबाबत सध्या कोणतीही घोषणा केली जाणार नसल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टीका केली.
महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या- राज ठाकरे
कोण किती जागा लढवणार आकडा काय हे मी तुम्हाला सांगणार नाही, असं म्हणत महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती अॅड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाणार आहे. योग्य वेळी उमेदवारांचे अर्ज भरण्याबाबत माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्यांचे महाराष्ट्र आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी या युतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांमार्फत जनतेला केले. मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि तो आमचाच असणार, असा ठाम विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. जे काही बाकी बोलायचं आहे ते जाहीर सभा सुरू होतील तेव्हा बोलू.
मराठी माणसानं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली- उद्धव ठाकरे
मुंबई महाराष्ट्रानं मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले. मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायचे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचे प्रतिनिधी वरती म्हणजेच आता दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल, म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आलो आहोत ते कायम एकत्र राहण्यासाठीच, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विधानसभेच्या वेळेला भाजपानं जो अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही. मराठी माणसाने आपला वसा जपावा आणि योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण समाप्त केले.
या युतीच्या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या एकत्र येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule