
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। अबॅकस वैदिक गणित परीक्षेत माणगाव येथील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे (सी.बी.एस.सी.) शाळेतील इयत्ता पाचवीतील कु. प्रार्थना सुशांत लाड हिने उल्लेखनीय यश संपादन करत रायगड जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळा, कुटुंब व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अबॅकस ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली जाते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत गणितीय क्रिया जलद व अचूकपणे सोडवण्याची क्षमता विकसित होते. तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी अबॅकस पद्धती उपयुक्त ठरते. याच उद्देशाने अबॅकसतर्फे दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात.
दि. २१ डिसेंबर रोजी डोंबिवली येथील लोढा हायस्कूलमध्ये ही परीक्षा पार पडली. या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधून ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कठीण स्पर्धेत कु. प्रार्थना लाड हिने वैदिक गणित प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला.
तिच्या या यशामुळे आई-वडील, आजोबा माजी सभापती रविंद्र लाड, शिक्षकवर्ग व शाळेचा नावलौकिक वाढला आहे. प्रार्थनाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन व कौतुक होत असून, भविष्यात ती आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके