कांद्याचे दर घसरले; शेतकरी चिंताग्रस्त
लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेत 775 रुपयांची घसरण लासलगाव, 24 डिसेंबर (हिं.स.)। आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे कांदा
उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात ८४९ रुपये, तर लाल कांद्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण


लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेत 775 रुपयांची घसरण

लासलगाव, 24 डिसेंबर (हिं.स.)। आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे कांदा बियाणे कंपन्यांनी बियाणे उत्पादित करण्यासाठी लागणार्‍या कांद्याची खरेदी थांबवल्याने त्याचा परिणामदेखील दर घसरणीवर झाला आहे, तसेच बांगलादेशसह इतर देशांत कमी प्रमाणात होत असलेली कांद्याची निर्यात याचाही परिणाम कांद्याच्या दर घसरणीवर झाला आहे.

गेल्या आठवड्यातील मंगळवारच्या (दि. 16) तुलनेत लाल कांद्याच्या सरासरी दरात 775 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या सरासरी दरातदेखील 1099 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकट्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याची अंदाजे 20 हजार क्विंटल आवक झाली.

बाजारभाव कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 2800 रुपये तर सरासरी 1725 रुपये असे होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव कमीत कमी 900 रुपये, जास्तीत जास्त 1612 रुपये, तर सरासरी 1151 रुपये असे होते. येणार्‍या काही दिवसांत आवक कायम वाढत राहिल्यास दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तविली जाते.

चौकट

कांदा बियाणे कंपनीचा खरेदीचा कोठा बहुतेक पूर्ण झाला असल्याने त्यांनी बियाण्यांसाठी लागणार्‍या कांद्याची खरेदी थांबवली आहे तसेच बांगलादेशात कांद्याची निर्यातदेखील कमी प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्यांमुळे इतर ख्रिस्ती देशातून कांद्याच्या मागणीत झालेली घट व सर्वांत महत्त्वाचे देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक, या चारही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून लाल कांद्याच्या दरातील घसरणीवर होत आहे.

– मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande