ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही- मुख्यमंत्री
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीची घोषणा केली. मात्र,यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री
ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही- मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीची घोषणा केली. मात्र,यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीचा प्रचार असा केला जात आहे, जणू रशिया आणि युक्रेन एकत्र आले आहेत आणि झेलेन्स्की व पुतिन चर्चा करत आहेत.” ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.

मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे लोक हिंदुत्ववादाशी फारकत घेतात, मतांसाठी लांगुलचालन करतात त्यांची काय अवस्था होते, हे सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही, तर तो भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. भारतीय जीवनपद्धतीला स्वीकारणारा आमचा हिंदुत्ववाद आहे. प्रभू श्रीरामांना मानणारा प्रत्येक जण हिंदुत्ववादी आहे. मग त्याची जात धर्म आम्ही पाहत नाही. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना सुनावले.

ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे पण त्यामुळे फार काही राजकीयदृष्ट्या घडणार नाही. पक्षाला निवडणुकीतील आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे. यामुळे फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण मुंबईकरांचा सातत्याने या मंडळींनी विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम यांनी केले. मराठी माणूस यांच्यासोबत नाही. अमराठी माणसांवर हल्ले केल्याने तेही यांच्यासोबत नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यांनी अजून दोन चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर हे महायुतीचे काम पाहून, भविष्यातील काम बघून महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले, “दोन्ही पक्ष अस्तित्वाच्या संकटातून जात आहेत. या पक्षांनी वारंवार भूमिका बदलून जनतेत अविश्वास निर्माण केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे त्यांनी आपला मतदारसंघ गमावला आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काय फरक पडणार आहे? जर ते केवळ आपले अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र येत असतील, तर ते निवडणूक जिंकू शकणार नाहीत. दोन्ही भावांची आता कोणतीही ठोस विचारधारा उरलेली नाही; ते फक्त संधीसाधू राजकारण करत आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande