दर्यापूरात उमेदवारीतील हट्ट, अंतर्गत नाराजी आणि मतविभाजनामुळे भाजपचा पराभव
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)। दर्यापूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला असून, या पराभवामागे आमदार प्रकाश भारसाकळे यांचा ‘राजहट्ट’, चुकीचे उमेदवारी वाटप आणि कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्याचा आरोप होत आहे
उमेदवारीतील हट्ट, अंतर्गत नाराजी अन् मतविभाजनामुळे भाजपचा पराभव


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)।

दर्यापूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला असून, या पराभवामागे आमदार प्रकाश भारसाकळे यांचा ‘राजहट्ट’, चुकीचे उमेदवारी वाटप आणि कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्याचा आरोप होत आहे. या निकालानंतर स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रचारात भाजपचे कार्यकर्ते दिसत असले, तरी मनाने ते पक्षासोबत नव्हते, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची अधिकृत युती असतानाही अपेक्षित समन्वय दिसून आला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याने महायुतीतील विस्कळीतपणा मतदारांसमोर स्पष्ट झाला आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला.दर्यापूर नगरपालिकेच्या २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १६ जागा लढवल्या; मात्र त्यापैकी केवळ ४ जागांवरच विजय मिळविता आला. अनेक ठिकाणी अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला.नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपसाठी ‘विस्फोटक’ ठरली. कट्टर हिंदुत्ववादी आणि आरएसएसशी निष्ठा ठेवणारे प्रदीप मलिये यांनी नगराध्यक्षपदासाठी जोरदार दावा केला होता. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करूनही आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्नी नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरला. अखेर पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या प्रदीप मलिये यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट)कडून निवडणूक लढविली.निकालात काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे यांनी ८ हजार ९२५ मते मिळवून विजय मिळविला. शिवसेना (शिंदे गट)चे प्रदीप मलिये यांना ६ हजार ४३१ मते मिळाली, तर भाजपच्या नलिनी भारसाकळे यांना केवळ ४ हजार ८४० मते मिळाली. मतविभाजनाचा फटका बसल्याने नलिनी भारसाकळे यांचा ४ हजार ८५ मतांनी पराभव झाला.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने ९ जागा लढवून केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपकडून मागील टर्ममधील नगराध्यक्षांनाच पुन्हा संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. जनतेत ज्यांच्याविषयी नाराजी होती, त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याचा फटका पक्षाला बसल्याचे आता स्पष्ट होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande