
परभणी, 25 डिसेंबर (हिं.स.)। गंगाखेड शहराच्या मुख्य रस्त्यासह विविध भागांमध्ये कॅफे हाऊस व चायनीज हॉटेल्स मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, या ठिकाणी ग्राहकांना तथाकथित ‘प्रायव्हसी’ दिली जात असल्याने गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे अशा कॅफे हाऊसमधील प्रायव्हसी अड्डे तातडीने बंद करून शहरातील रोडरोमीओंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
यासंदर्भात यादव यांनी आज पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. त्याद्वारे, शहरातील अनेक कॅफे हाऊसमध्ये आवश्यकता नसताना छोट्या केबिन तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले असून, या केबिनमध्ये अश्लील चाळे तसेच अवैध नशापाण केल्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा खासगी जागा उपलब्ध करून देण्यासाठी काही हॉटेल चालकांकडून जादा दराने रकमेची वसुली केली जात असल्याची बाबही त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.
यासोबतच शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गांच्या परिसरात रोडरोमीओंचा वावर वाढला असून, अल्पवयीन मुलींचा पाठलाग करणे, त्यांना धमकावणे तसेच विविध कारणांनी ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकार रोखण्यासाठी चिडीमार पथक व दामिनी पथक अधिक सक्रिय करावे, तसेच सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली.
दरम्यान, पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी या निवेदनाची दखल घेत शहरातील कॅफे चालकांना पोलिस ठाण्यात पाचारण केल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis