ठाणे - युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिका-यांनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ
ठाणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष गिरी
ठाणे


ठाणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा राम राम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.२५ डिसेंबर) हा पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विरू वाघमारे उपस्थित होते.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विविध पक्षातील आजी - माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश सुरु आहे. गुरुवारी ऐन नाताळचा मुहुर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांना जोर का धक्का दिला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष गिरी यांच्या समवेत, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षिरसागर व गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा उपाध्यक्ष राजु राय, ओवळा माजिवाडा विधानसभेचे उपाध्यक्ष गणेश गुप्ता व हर्षल परदेशी, ओवळा - माजिवडा विधानसभा सरचिटणीस योगेश मिश्रा,कोपरी - पाचपाखाडी विधानसभा सरचिटणीस राहुल पटवा, युवक कांग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अरुण गिरी,गिरीश राणे, स्वप्निल पाटील, रौनक पवार, आर्यन प्रसाद, गिरीश चव्हाण आदींसह शेकडो युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे घडयाळ हाती बांधले. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर ॲड. आशीष गिरी यांनी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस पक्षावर आपली मुळीच नाराजी नसुन पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन काँग्रेस सोडल्याचा आरोप केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाने प्रेरीत होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे स्वागत करून नजीब मुल्ला यांनी, येत्या काळात तमाम तरुणाईला सोबत घेऊन राष्ट्रवादीला ठाणे शहरात जास्तीत जास्त यश मिळवुन देण्याची शपथ दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande