
बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात हिवाळ्यात सुरुवातीपासून यंदा थंडीचा जोर आहे. यामुळे रब्बीतील गव्हाच्या पिकाला यंदा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
चांगला झालेला पाऊसकाळ आणि त्यानंतर हिवाळ्यातील थंडीचा अंदाज घेवून शेतकऱ्यांनी यंदा ३ हजार २९८ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात थंडीची लाट कायम असुन ही थंडी गव्हाच्या पिकाला लाभायदायक ठरणारी आहे. यामुळे यंदा गव्हाचे चांगले उत्पादन होणार अंदाजही शेतकऱ्यांमधून मांडला जात आहे. कोणत्याही पीकाच्या वाढ आणि पोषणक्षमतेसाठी त्यास अनुकुल अशा हवामानाची आवश्यकता असते. त्याचा थेट परिणाम हा पिकाच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो.
मागील पाचवर्षात कमी पाऊस व त्यानंतरच्या पाणीटंचाईमुळे गव्हाचे क्षेत्र मर्यादीत होते. परंतु यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला आणि यात खरिपातील पिके वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या.
यामुळे प्रचंड प्रमाणातील झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी रब्बीतील पिकांवर आशा ठेवली. विशेषतः ज्वारीनंतर महत्वाचे अन्नधान्य पिक म्हणून बाजारात हमखास चांगला भाव मिळणाऱ्या गव्हाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळेच यंदा गव्हाच्या पिकाचा पेरा हा ३ हजार २९८ हेक्टरवर पाहोचला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis