
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : येथील लायन्स क्लबतर्फे प्रतिवर्षी समाजामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्काराने करण्यात येतो. या वर्षी हे पुरस्कार सदानंद भागवत, गौरांग आगाशे, संदीप तावडे, श्रीमती वीणा लेले आणि सौ. शमीन शेरे यांना घोषित करण्यात आले आहेत.
हे पुरस्कार लायन क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येतात. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे आहे.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदानंद भागवत यांना सन्मानित केले जाणार आहे. अनबॉक्स या स्टार्टअपमधून रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक कचरा संकलन करण्याचा उपक्रम राबवणारे उद्योजक गौरांग आगाशे, ॲथलेटिक्स (धावणे, खो- खो, मॅरेथॉन) या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे संदीप तावडे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. वृद्धाश्रमाची निर्मिती करून त्या सुयोग्य पद्धतीने चालवणाऱ्या आणि आता २०० जणांसाठी वृद्धाश्रम बांधणाऱ्या वीणा लेले आणि दिव्यांग मुलांसाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या सौ. शमीन शेरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या व्यक्तींचा गौरव २४ जानेवारी रोजी प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते प्रांतपालांच्या अधिकृत भेटीदरम्यान करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी