
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची आवक कमी
लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची आवक कमी होत आहे. पहिल्यांदाच सोयाबीनचा सर्वाधिक दर ५ हजार रूपयांवर पोहचला आहे. तरीही शासनाच्या हमीभावापेक्षा कमीच दर सोयाबीनला मिळत आहे. शासनाने सोयाबीनला ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहिर केला आहे. या हमीभावाच्या तुलनेत लातूरच्या आडत बाजारात शेतक-यांना प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रूपयांचा फटका बसत आहे.
लातूर जिल्हयात यावर्षी ५ लाख ९१ हजार ६६५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. या मध्ये ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ७० हजार ६६९ हेक्टर, मूग ७ हजार २२६ हेक्टर, उडीद ६ हजार १८६ हेक्टरवर पेरणी झाली होती. खरीप हंगामातील मुग, उडीद पिकांची काढणी झाल्या नंतर शेतमाल लातूरच्या आडत बाजारात विक्रीसाठी येत आहे. लातूरच्या आडत बाजारात ५१ हजार ८८४ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ३५० रूपये दर मिळाला. २१ हजार ६५८ क्विंटल सोयाबनची आवक होऊन सर्वाधिक ४ हजार ४९८ रूपये सर्वाधिक दर मिळाला. ८ हजार १८१ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ५ हजार रूपये दर मिळाला आहे. या वर्षातील सर्वाधिक दर आहे. पहिल्यांदाच सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाल्याने नव्या वर्षात सोयाबीन ५ हजार रूपयांच्या पुढे जाईल अशी अपेक्षा शेतक-यामधून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis